नागरिक व गुरांचे आरोग्य धोक्यात
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्याचा देखिल अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग हि मोकाट गुरे पालीत कचराकुंड्या व उकिरड्यावर जावुन मिळेल ते खात आहेत. तसेच भटके कुत्रे देख उकिरड्यावर येतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कचर्याची समस्या गंभीर होऊन स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
येथील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळ पासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येते. बर्याचवेळा टाकुन दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते त्यामूळे गुरे मरतात देखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखिल मृत्यू होतो. आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते.
उष्म्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत. – आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली, नगरपंचायत
शेतकर्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचर्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जिवन अंगिकारणे गरजेचे आहे. – डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड