मेंगाळवाडीची पाण्यासाठीची वणवण थांबणार

रोटरी क्लबकडून गावात बोअरवेल मंजूर

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. या भागात पाण्याचेदेखील दुर्भिक्ष्य आहे. तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या मेंगळवाडीची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. भरपावसाळ्यातसुद्धा येथील आदिवासी बांधवांना खड्ड्यांतून पाणी पिण्याची वेळ येते. ही समस्या लक्षात घेऊन नेरळ येथील शिक्षक रवी काजळे यांनी ही बाब रोटरी क्लबच्या निदर्शनास आणून दिल्याने रोटरी क्लबने याठिकाणी बोअरवेल मंजूर केली आहे. त्यामुळे मेंगळवाडीच्या आदिवासी बांधवांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.

तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मेंगाळवाडीतील आदिवासी बांधवाना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते. साधारण 30 ते 35 घरांची वस्ती असलेल्या मेंगाळवाडीत 100 ते 125 लोक राहतात. वाडीसाठी 2 विहिरी आहेत. मात्र वाडीपासून विहिरींचे अंतर खूप आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण तर करावी लागतेच पण सोबत पावसाळ्यातदेखील परिस्थिती वेगळी नाही. पावसाळ्यात पाण्यासाठी गावाजवळील डोंगराच्या कपारीत खड्डा करून ज्याला आदिवासी लोक डवरा म्हणतात त्यात पाणी साठवून ते पाणी वाडग किंवा छोट्या पातेल्याच्या सहाय्याने भांड्यात भरून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ही बाब शिक्षक रवी काजळे यांनी रोटरी क्लब यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रोटरी क्लब डोंबिवली सिटी सेक्रेटरी सविता नाझरे, प्रोजेक्ट हेड मंदार, विजय नाझरे, शिक्षक रवी काजळे यांनी नुकतीच वाडीत येऊन पाहणी केली. येथील परिस्थिती पाहता तात्काळ या योजनेस मंजुरी दिली. तर बोअरवेल मारण्याच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शासकीय योजनांचा पाझर फुटेल कि नाही हे माहीत नसलेल्या ग्रामस्थांना रोटरीमुळे थोडा का होईना दिलासा मिळणार असल्याने त्यांनी संधान व्यक्त केले आहे.

आम्हाला वाडीत पाण्याची मोठी समस्या आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बायकांना डोक्यारवून उन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. तर पावसाळ्यात विहरी लांब असल्याने डवरा (खड्डा) खोदून त्यातून पाणी जमा करावे लागते. आता बोअरिंगमुळे वाडीत पाणी आलं तर बरं होईल. आम्ही आनंदी आहोत.

जना बांगरे, ग्रामस्थ
Exit mobile version