घन कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागणार

17 ग्रामपंचायतींना घंटागाडी; 1 कोटी 27 लाख रुपयांचा निधी वितरीत

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

ग्रामीण भागातील कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. दहा तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींना घंटागाडी देण्यासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थ संकल्पात केली आहे. घंटागाडी खरेदीसाठी गटविकास अधिकारी यांना 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांच्या निधी वितरीत केला आहे. यामुळे जिल्ह्यातील घनकचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरणाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत आहे. पर्यटन व औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळे प्रकल्प जिल्ह्यात होऊ घातले आहेत. जिल्ह्यामध्ये नागरिकीकरणदेखील वाढू लागले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील लोकवस्ती वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला आहे. गावांच्या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. यामुळे गावे, वाड्यांमध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यामध्ये अलिबाग व पनवेल तालुक्यातील 8, महाडमधील 2, खालापूर, म्हसळा, माणगाव, तळा, पेण, कर्जत व श्रीवर्धनमधील प्रत्येकी 1 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत घंटागाडी खरेदी करण्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. घंटागाडी खरेदी करण्यासाठी 17 ग्रामपंचायतींना 7 लाख 50 हजार रुपये प्रमाणे 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी देण्यासाठी गटविकास अधिकारी यांना फेब्रुवारी 2024 वितरीत केल्याची माहिती समोर आली आहे.

या ग्रामपंचायतींना निधी वितरीत केला
महाड
- अप्पर तुडाल, विन्हेरे,
अलिबाग- परहूर, पेढांबे, चरी, पेझारी
खालापूर- गोरठण बुद्रूक
म्हसळा- खरसई
पनवेल- कराडे खुर्द, पळस्पे, आकुर्ली, उमरोली
माणगाव- तळाशेत
तळा- वाशी हवेली
पेण- वढाव
कर्जत- वावळोली
श्रीवर्धन- खारगांव

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात घंटागाडी देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. घंटागाडी खरेदी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निधी वर्ग केला आहे.

राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, रायगड

Exit mobile version