| पनवेल । वार्ताहर ।
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने कोंडी होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून दि.18 ते 22 दरम्यान भुयारी मार्गातील रस्त्याची उंची वाढवण्यात येणार आहे. या कामामुळे कोंडीची शक्यता असली तरी भविष्यात तळोजातील प्रवेश निर्विघ्न होणार आहे.
सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या वर्षी रेल्वे फाटक लगत पन्नास कोटीहून अधिक रुपये खर्च करून भुयारी मार्गात काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र जमिनीतील पाणी या काँक्रिटच्या रस्त्यामधून बाहेर येत असल्यामुळे या मार्गावर बाराही महिने पाणी साचते. तसेच निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे भुयारी मार्गात चिखल साचून अपघाताच्या घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहणारे पाणी रोखण्यासाठी भुयारी मार्गातील रस्त्याची उंची वाढवण्यात येणार आहे. याच अनुषंगाने दि.18 ते 22 या कालावधीत दोन्ही मार्गीकेवर एक फूट उंचीचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या काळात एकेरी मार्ग सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
तळोजा भुयारी मार्गात करण्यात येणार्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी परवानगी मागितली आहे. वाहतूक विभागाचे नवीन उपायुक्त रजू झाले असून परवानगी मिळविण्यासाठी पत्र व्यवहार सुरु आहे.
महेश पाटील
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळोजा वाहतूक शाखा