पालीत कचर्‍याची समस्या गंभीर

घंटागाड्या असूनही कचरा रस्त्यावर
प्लास्टिक खाणार्‍या गुरांचा जिव धोक्यात

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. वर्षानुवर्षे कचर्‍याची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. शहरात नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरून देखील काही नागरीक फुटक्या कचरा कुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. कचरा कुंड्यात काही खाद्य मिळेल यासाठी गुरे कचर्‍यातील प्लास्टिक पिशव्या खात आहेत, परिणामी गुरांच्या जीवितास ही धोका निर्माण झाला आहे.
पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतर्फे 4 वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या नगरपंचायतीकडे 4 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागात फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून रविवारीच फक्त घंटागाड्या येत नाहीत. त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या व रस्त्याच्या कडेला कचर्‍याचा ढीग पडलेला असतो. तर इतर दिवशी देखील हीच परिस्थिती पहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच अनेकजण घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच कचरा कुंड्यांमध्ये व रस्त्यावर टाकतात. त्यामुळे गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

अपुरे सफाई कर्मचारी
पाली नगरपंचायतीकडे अधिकृत 15 ते 18 सफाई कर्मचारी आहेत. मात्र तुटपूंजा पगार व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम 9-10 कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही.

Exit mobile version