भुसंपादनाची प्रक्रीया जलदगतीने होणार: आ. जयंत पाटील

बांधकाम मंत्र्यांकडून दखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

पाली येथील बाह्यवळणाच्या रस्त्याला निधीची मंजूरी असताना संबंधितांकडून कार्यवाही करण्यात आली नाही. त्याबाबत शेकापचे नेते आ. जयंत पाटील आक्रमक झाले. त्यांनी अधिवेशनात या मुद्यावर चर्चा करून सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, काम न करणाऱ्या संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बांधकाममंत्री चव्हाण यांनी दुजोरा देत भुसंपादनाची प्रक्रीया जलदगतीने केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

सुधागड तालुक्यातील पाली येथील बाह्यवळण मार्गाला 14 वर्षापूर्वी मंजूरी दिली आहे. रस्त्यासाठी शासनाने 18 कोटी रुपये आणि भूसंपादनासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. बाह्यवळणाच्या भूसंपादनासाठी नऊ हेक्टर जागा संपादीत करण्यात आली आहे. पाली, बलाप, बुरमाळी, झाप येथील भुसंपादन जागेचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणती कार्यवाही केली असा प्रश्न उपस्थित करीत बाह्यवळण मार्गास 14 वर्षापूर्वी मंजूरी देऊनही या मार्गाचे काम न करणाऱ्या दोषींविरोधात करण्यात यावी, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी केली.

यावर बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी पाली बाह्यवळणाच्या भुसंपादनासाठी जागा संपादीत केल्याचे कबूल केले असून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे सांगितले. तसेच, झाप व बुरमाळी गावांच्या मुल्यांकनास जिल्हास्तरिय मुल्यांकन समितीकडून मंजूरी मिळाली आहे. पाली व बलाप या प्रस्तावास त्रुटी असल्याने नव्याने प्रस्तावर सादर करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांच्या हरकतींमुळे मोजणी वेळेत न झाल्यामुळे रस्त्याच्या आराखड्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये दुमत असल्याने भुसंपादन प्रक्रीया पुर्ण झाली नाही. रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रीया जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

Exit mobile version