आ. जयंत पाटील यांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील मासळी व्यवसाय संकुल उभारण्याचे काम निधीअभावी रखडलेले नाही. त्यासाठी आतापर्यंत 2 कोटी 36 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न शेकापचे आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये अलिबागमधील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्रदर्शनालय व संग्रहालय यांच्या बांधकामासाठी 2.36 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून दिनांक 7 मे, 2022 रोजी मत्स्यव्यवसाय विभागास प्राप्त झालेला आहे. हा प्राप्त निधी रायगडच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास Public Financial Management System (PFMS) प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आला असल्याचे नमूद केले आहे.
मूळ प्रश्नात जयंत पाटील यांनी सरकारला असे विचारले होते की, मच्छिमारांचा आर्थिक विकास साधणे आणि पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अलिबागमध्ये कोळीवाड्याजवळ मासळी व्यवसाय संकुल उभारण्याचे काम निम्मे पूर्ण झालेले असून, निधीअभावी ते काम सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या संकुलामध्ये मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत मत्स्यालय, संग्रहालय, वाचनालय, सभागृह, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह व मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, अपुर्या निधीअभावी या केंद्राचे काम अपूर्ण आहे. यासाठी तात्काळ निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.