कुंभारवाड्यातील सुगडीला मोठी मागणी
। चिरनेर । प्रतिनिधी ।
मकरसंक्रांतीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे उरणसह पनवेल, नवी मुंबई व मुंबईच्या बाजारात प्रचंड मागणी असलेल्या काळ्या-लाल रंगाच्या मातीची सुगड्या बनविण्यासाठी चिरनेरच्या कुंभार वाड्यात लगबग सुरू झाली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतानंतर पहिलाच येणारा सण मकरसंक्रात हा आहे. या दिवशी माणुसकीची नाती, मैत्रीतील क्लिमिष दूर करण्यासाठी तिळगुळ वाटून गोड गोड बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, अशी साद घालून दोन्हीकडून प्रेमाने एकमेकांना भेटून गोडवा पसरविण्याचे काम केले जाते. या सणानिमित्ताने महिला वर्गात सुगड पुजण्याची प्रथा आहे. मातीच्या छोट्या मडक्यात गव्हाच्या औंब्या, भुईमुगाच्या शेंगा, बोर, साखर, फुटाणे, लाडू, हरभरे, गाजर, ऊस व फुले घालून अनेक महिला पूजा करून वाण देत असतात.
मकरसंक्रातीच्या दिवशी सुगडीतून वाण देण्याची प्रथा घाटावरील महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यात काही महिला लाल तर काही महिला काळी सुगडी पूजेसाठी वापरत असतात. आधुनिकरण आणि शहरीकरणामुळे मातीच्या भांड्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली असली तरी मकर संक्रातीला मातीने बनविलेल्या लाल-काळ्या अशा दोन्ही रंगाच्या सुगडीला मोठी मागणी आहेे. त्यामुळे उरण तालुक्यातील चिरनेर, तेलीपाडा, मुळेखंड येथील कुंभारवाड्यात मागील महिनाभरापासून लाल-काळ्या रंगाची सुगड बनवण्याची लगबग येथील महिला वर्गात सुरू झाली आहे.
कुंभारवाड्यात दहा ते पंधरा रुपये दराने एका सुगडीची विक्री केली जाते. किरकोळ बाजारात पोहोचल्यानंतर एक सुगडी 20 ते 30 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. घाटी महिलांकडून मकरसंक्रातीच्या निमित्ताने सुगडीला जास्त मागणी आहे. तसेच, दशक्रिया विधीसाठीही सुगडीचा वापर केला जातो. त्यामुळे वर्षभरात जवळजवळ एक हजाराच्या आसपास सुगडीची मडकी बनवित असल्याचे कुंभार वाड्यातील कुंभारांकडून सांगण्यात आले आहे.
उरणसह आजूबाजूच्या बाजारपेठांत मागणी
शेतातील माती आणून ती भिजत घालून, गाळून त्यानंतर माती मळून ती मऊ करून चाकावर छोटी छोटी मडकी बनविण्यात येतात. त्यानंतर ही मडकी उन्हात वाळवून, भट्टीत चांगल्या प्रकारे भाजणे अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. काही ठिकाणी पारंपरिक चाकावर तर काही ठिकाणी विजेच्या मोटारीवरही सुगडी बनवली जातात. या बनविण्यात आलेल्या सुगडीला उरणसह मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील बाजारात मोठी मागणी असल्याचे कुंभारवाड्यातील महिलांकडून सांगण्यात आले आहे.