गोंधळीच्या मक्तेदारीला प्रकल्पग्रस्तांचा दणका

खानावमध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनलची बाजी

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या अनेक वर्षापासून एक हाती सत्ता मिळविणाऱ्या अनंत गोंधळी यांना या निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांनी चांगलाच दणका दिल्याचे समोर आले आहे. खानाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत 14 जागांपैकी दहा जागांवर सरपंचसह ग्रामविकास परिवर्तन पॅनलने बाजी मारली. सरपंचपदाचे उमेदवार अजय नाईक यांना 1947 तर विरोधकांना 1531 मते मिळाली. त्यामुळे ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी 406 मतांनी विजय मिळविला.


प्रकल्पग्रस्त, बेरोजगारी अशा अनेक मुद्दयांवर नीलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनल उभे करण्यात आले. गोंधळी यांच्या मक्तेदारीला व हुकूमशाहीला खानावमधील असंख्य ग्रामस्थ कंटाळले होते. तरुणाईमध्ये असंतोष पसरला होता. अखेर त्यांनी या निवडणुकीत गोंधळींच्या पॅनलला चांगलाच दणका दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलमधील थेट सरपंचपदाचे उमेदवार अजय नाईक, सदस्यपदाचे उमेदवार नीलेश गायकर, विशाखा गायकर, सज्जला शिंदे, संदेश पडवळ, मनीषा म्हात्रे, अनिकेत नाईक, सुचिता म्हात्रे, युक्ता गुजर या बहुमताने तर निधी नयन पाटील या बिनविरोध निवडून आले. खानाव ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे विरोधकांची सत्ता होती. ही सत्ता उलथवून पाडण्यास ग्रामविकास परिवर्तन पॅनलला यश आले. त्यामुळे विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांसह महिला, तरुणाईंनी साजरा केला.

Exit mobile version