कंपनीच्या कामावर परिणाम, दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामाला ब्रेक
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल कंपनीच्या विरोधात शुक्रवारपासून प्रकल्पग्रस्तांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्याचा विपरित परिणाम कंपनीच्या कामावर होऊ लागला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामालासुध्दा ब्रेक लागला आहे. या आंदोलनाचा कंपनी प्रशासनाने धसका घेतला आहे. ते मोडीत काढण्यासाठी आणि काम पुन्हा वेगळ्या पध्दतीने सुरु करण्यासाठी कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांची गुप्त बैठक शनिवारी दुपारी आरसीएफ सोसायटीमधील सभागृहात झाल्याची माहिती समोर येत आहे.
वर्षापासून गेल प्रकल्पग्रस्त व स्थानिक त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत. अनेक वेळा बैठका झाल्या. जिल्हाधिकारी दालनात प्रशासनाच्या मध्यस्थीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे कंपनी प्रशासन गांभीर्याने घेत नाही. अखेर शुक्रवार एक डिसेंबरपासून संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या वतीने निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले.
या आंदोलनात कामगार, प्रकल्पग्रस्त, स्थानिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. दर दिवशी सुमारे साडेतीन हजार कर्मचारी या कंपनीत काम करतात. हे कर्मचारी आंदोलनात सहभाग झाल्याने कंपनीच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे सुरु असलेले कामदेखील अचानक थांबले आहे. हे काम जलद गतीने व्हावे अशी कंपनी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र आंदोलनामुळे त्यांना शक्य होत नाही. दोन दिवसांपासून काम बंद असल्याने कंपनीतील काम ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा धसका प्रशासनाने घेतला आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील सोसायटीच्या सभागृहात गेल कंपनीचे अधिकारी, ठेकेदार यांची दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीत काम कशा पध्दतीने चालू करायचे अशा रणनितीचा विचार झाला. ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या. दरम्यान काही ठेकेदारांनी विरोध करीत पहिले आंदोलकांचा प्रश्न मार्गी लावा, असे सांगितले.त्यामुळे ही बैठकदेखील फारशी यशस्वी झाली नसल्याची चर्चा आहे. तब्बल एक तास ही बैठक चालली.