न्यायासाठी लढणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पोलीसांनी घेतले ताब्यात

| उरण | वार्ताहर |

धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. कंपनीने ५ जानेवारी २०२४ पूर्वी प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले होते.मात्र त्या आश्वासनाची पूर्तता कंपनीच्या व्यवस्थापनाने केली नाही. यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पातील रोजगार आणि नोकरीमध्ये स्थानिकाना सामावून घेतले नाही. त्यामुळे या प्रकल्पात स्थानिकांना सामावून घ्यावे यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा कंपनी प्रशासना सोबत संघर्ष सुरू आहे. कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यास टाळाटाळ करत होती . त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २० नोहेंबर २०२३ पासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली या उपोषणामध्ये गावातील २३ प्रकल्पग्रस्तांनी सहभाग घेतला होता.

प्रकल्पग्रस्तांच्या या लढ्याला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला होता. दरम्यान सिडको, कंपनी प्रशासन , तहसिलदार आणि पोलिस हे या आंदोलनातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना.उपोषणाच्या ९ व्या दिवसांनंतर कंपनी प्रशासन आणि धुतूम ग्रामस्थ यांच्यात अखेर सामोपचाराने चर्चा झाली. यामध्ये इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनीत कंत्राटामध्ये ३३ अकुशल प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि कंपनीत ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस गावातील सुशिक्षित बेकारांना पहिले प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शुक्रवारी ( ५ जानेवारी २०२४) ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर,कविता पाटील, सुचिता कडू, चंद्रकांत ठाकूर, स्मिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, अनिता ठाकूर, रविनाथ ठाकूर यांच्यासह गावातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले असता पोलिसांनीआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यामुळे परिसरात कंपनी व प्रशासना विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version