ताम्हणी घाटातील संरक्षक भिंती धोकादायक

। माणगाव । प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हणी घाटातील संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षापूर्वी या मार्गावर काही ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या होत्या, त्या सध्या कमकुवत झाल्या आहेत. ताम्हाणी घाटातील कमकुवत संरक्षक भिंतीमुळे अपघाताला सध्या निमंत्रण मिळत आहे. तर अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे नसल्यामुळे प्रवाशांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ताम्हणी घाटातील रस्ता हा पूर्णतः नागमोडी वळणाचा असल्यामुळे संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीचा अभाव असून खोल दर्‍यांमुळे वाहन चालकांना धोका संभवतो. या मार्गावर वाहतुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच भिरा येथील देवकुंड हे पर्यटकांचे व ट्रेकर यांचे प्रमुख आकर्षण बनल्यामुळे कोकणात येणारे पर्यटक हे या घाटामध्ये थांबून निसर्गरम्य परिसराचे दर्शन घेऊन पुढील प्रवास करत असतात. तसेच कोकणात येण्यासाठी हा मार्ग प्रवासाच्या दृष्टीकोनातून जवळ असल्यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या घाटातील खोल दर्‍या हे प्रवाशांचे आकर्षण झाले आहे. या दर्‍या व डोंगर रस्त्याच्या कडेलाच असल्यामुळे तेथे काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नसल्यामुळे पर्यटक व प्रवाशांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अवघड वळणांवरील खोल दर्‍यांच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे व संभाव्य होणार्‍या अपघातांपासून प्रवाशी जनतेचे संरक्षण व्हावे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पर्यटक व या मार्गावरील नेहमी प्रवास करणारे प्रवाशी यांच्यातून व्यक्त होत आहेत.

Exit mobile version