वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील भेंडखळ आठ वर्षीय हर्षिती भोईर पुन्हा एकदा जगाच्या पटलावर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरली आहे. अत्यंत कठीण मानला जाणारा केदारकंठ ट्रेक निर्धारीत वेळेपेक्षा अर्ध्या वेळेत पूर्ण करून जगातील लहान गिर्यारोहक ठरली आहे. याची नोंद घेत ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने तिला प्रमाणीत केले आहे. या विक्रमानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गिर्यारोहणाची आवड असणार्या हर्षितीची नोंद पुन्हा एकदा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेने घेतली आहे. केदारकंठ हा उत्तराखंड विभागातील एक गिर्यारोहकांचा आवडता मात्र अत्यंत कठीण असा ट्रेक असून, देश-विदेशातून अनेकजण गिर्यारोहणासाठी येत असतात. आठ वर्षीय हर्षिताने फेब्रुवारी 6 रोजी हा ट्रेक सुरु करून, 7 फेब्रुवारीला पूर्ण केला होता. भल्याभल्यांना दिवसांत हा ट्रेक पूर्ण करता येत नाही. मात्र, हर्षितीने हा ट्रेक अवघ्या दोन दिवसांत पूर्ण केल्याने दिग्गज गिर्यारोहकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
हाडे गोठवणारी थंडी, उणे 6 अंश तापमान, बर्फाने वेढालेला प्रदेश, सतत होणारी बर्फवृष्टी या सर्व अडचणींवर मात करत तिने हा ट्रेक पूर्ण केला होता. याबाबतची नोंद ‘वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेने घेत, हर्षितिला केदारकंठ ट्रेक कमी वेळेत पूर्ण करणारी जगातील सर्वात लहान मुलगी म्हणून नोंद केली आहे.
दुसर्यांदा विक्रमाला गवसणी
हर्षिता वयाच्या तीन वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने आजवर राज्यातील अनेक गडकिल्ल्याची यशस्वी चढाई केली आहे. तर अत्यंत कठीण मानला जाणारा वजीर सुळका हर्षिताने दोन सर केला आहे. लिंगाणासारखा अवघड ट्रेकदेखील तिने पूर्ण केला. राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर तिने वयाच्या तिसर्या वर्षी चढून पार केला होता. तर पाचव्या वर्षी 12 तासात पाच गाडी सर केल्याने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. यामुळे हर्षिताची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लहान गिरयारोहक म्हणून नोंद झाली आहे. तिच्या विक्रमानंतर तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.