नाशवंत मालाच्या दुर्गंधीमुळे जनता हैराण

| चिरनेर । वार्ताहर ।

जेएनपीटी बंदरातील मालाची हाताळणी करणारी ग्लोबीकॉम टर्मिनल कंपनी नाशवंत मालाची विल्हेवाट चक्क खाडी किनार्‍याजवळील रस्त्यावर लावत आहे. या विषारी ड्रम्पिंग विरोधात परिसरातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत. नाशवंत मालाच्या प्रचंड दुर्गंधीने चिरनेरकरांचे डोके उठले आहे. कस्टम अधिकार्‍यानी कारवाई केलेल्या तीन कंटेनरमधील सडका माल येथे ठेवल्याने ही दुर्गंधी सुटल्याची माहिती या कंपनीतील कर्मचार्‍यानी दिली आहे.

कोप्रोली, उरण रस्त्यालगत असलेल्या ग्लोबिकॉन कंपनीतील काही कंटेनरमध्ये साठवून ठेवण्यात आलेला नाशवंत खाद्यपदार्थाचा माल प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या आवारातील खाडीकिनारी रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यालगत प्रताप केला आहे. त्या मालामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रार करूनही महसूल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी ग्लोबीकॉम टर्मिनल प्रकल्पावर कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान टर्मिनल प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी सलीम शिकलगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

परिसरात अनेक कंपन्या धाब्यावर बसून उत्पादन घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पागोटे, भेंडखळ, बांधपाडा खाडीत सोडण्यात येत असलेल्या विषारी केमिकल मुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. यानंतरही ठोस कारवाईच्या नावाने बोंबच असल्याने केमिकल लोच्या करणार्‍यांचे फावले आहे. अधिकारी कारखानदारांच्या सोटे लोटे असल्यानेच असे आरोग्याला घातक असणारे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Exit mobile version