रिक्षातून खाली पडलेली पर्स केली महिलेच्या स्वाधीन

वाकणच्या वाहतुक पोलिसांची कर्तव्य दक्षता

| नागोठणे |

रिक्षातून खाली पडलेली पर्स वाकणच्या वाहतुक पोलिस कर्मचार्‍याने परत केली. पोलिसाच्या कर्तव्य दक्षतेबाबत अक्षता दळवे आणि अविनाश दळवे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

जोगेश्‍वरी मुंबई येथे राहणार्‍या अक्षता अविनाश दळवे व त्यांचे पती मुंबई गोवा महामार्गावरुन शुक्रवार 22 डिसेंबर रोजी सकाळी रिक्षाने जोगेश्‍वरी मुंबई येथून दापोली येथे कामानिमित्त जात होते. मुंबई ते दापोली प्रवासादरम्यान त्यांची रिक्षा नागोठणे जवळील वाकण फाटा येथे आली असता यावेळी अक्षता दळवे यांची पर्स रिक्षातून रस्त्यावर पडली. याचवेळी रिक्षातून पडलेली पर्स महामार्ग पोलिस केंद्र वाकण-ऐनघर येथे कार्यरत असलेल्या पोलिस अंमलदार यांच्या निदर्शनास आली. यावेळी सापडलेल्या पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये एक विवो कंपनीचा मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅनकार्ड, घरातील महत्त्वाच्या चाव्या यांसह 6500 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज आढळून आला.

मिळालेल्या ऐवजात आधार कार्डवर असलेल्या मोबाईल नंबरच्या सहायाने महामार्ग पोलिसांनी तात्काळ संपर्क साधला. यानंतर महामार्ग पोलिस केंद्र वाकण-ऐनघर येथे कार्यरत असलेले पो.हवा. संदिप घासे, पो.हवा. संदिप पाटील, पो.हवा. विक्रम फडतरे, पोलिस हवालदार जनार्दन मेंगाळ या कर्तव्य दक्ष महामार्ग पोलिस कर्मचार्‍यांनी सापडलेली ती पर्स ऐवजासह सुरक्षितपणे अक्षता अविनाश दळवे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अक्षता दळवे व त्यांचे पती अविनाश दळवे यांनी महामार्ग पोलिसांचे आभार मानले.

Exit mobile version