| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी पुण्यात झालेल्या गुप्त भेटीचे कोडे अद्यापही न उलगडल्याने राजकीय तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.दोन्ही गटांनीही याबाबत अधिकृत खुलासा न केल्याने राष्ट्रवादीत नेमके चालले तरी काय,याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र शरद पवारांनी अजित माझा पुतण्या आहे. त्याला भेटण्यात गैर काय, असे सांगितले.
शनिवारच्या भेटीनंतर रविवारी सांगोल्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात एकत्र होते. तेथेही या भेटीबाबत उभयतांनीही काहीही वक्तव्य केले नाही. भेटीबद्दल बोलताना पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, कोण- कोणाला भेटलं यावर कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम असण्याची गरज नाही, लोक-लोकांना भेटत असतात. त्यामुळे याबद्दल विशेष सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ती गुप्त बैठक नव्हतीच. मी पवार साहेबांसोबत गेलो होतो, पण मी निघून आलो. त्यामुळे काय चर्चा झाली मला माहिती नाही, असे त्यानी सुचित केले.
या बैठकीमागे ईडीचा काही विषय नाही. निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात त्याना माहिती विचारण्यात आली आणि ते चार दिवसांपूर्वीच जाऊन आले. त्याचा आणि बैठकीचा काही संबंध नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
मला या भेटीविषयी काहीही माहित नाही. ही भेट झाली का? भेट झाली तर त्यात काय चर्चा झाली? यासंदर्भातला कुठलाही तपशील माझ्याकडे नाही. भेट कुठे झाली? किती वेळ चर्चा झाली याविषयी काहीही माहित नाही. त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही .
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबामध्ये सर्वात वडिलधारी व्यक्ती मीच आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही.
शरद पवार, खासदार
भाजपसमवेत कदापि जाणार नाही -पवार
आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक 31 तारखेला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे. 30 ते 40 वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा खा. शरद पवारांनी केला आहे.
सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांनी भाजपसमवेत युती नाही भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.असेही पवारांनी जाहीर केले.
अविश्वास ठरावाला उत्तर देतांना देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर प्रकरणाचा अत्यल्प उल्लेख केला. त्यांनी राजकीय हल्ले जास्त केले, हे योग्य नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशाच्या हितासंबंधी चर्चा होत आहे.
शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष