ब्रिटिशांनी उभारला स्मृतीस्तंभ
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
जगाच्या इतिहासात इ.स. 1914 ते 1918 या दरम्यान झालेले पहिले महायुद्ध खूप प्रभावशाली ठरले. त्यावेळी ब्रिटिशांकडून लाखो भारतीयांनी युद्धात सहभागी होऊन आपला पराक्रम दाखवला होता. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील पाटणूस या छोट्या गावतील काही सैनिकदेखील या युद्धात सहभागी झाले होते. त्यातील 45 जणांना युद्ध मरण आले. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने गावात स्मृतिस्तंभ उभारला. हा स्मृतिस्तंभ गावाची एक वेगळी ओळख जोपासत आहे.
या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणुस गावकर्यांसह सरपंच व ग्रामपंचायतीमार्फत 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला स्मृतिस्तंभ सजवला जातो आणि त्याला मानवंदना दिली जाते. या शहीद व स्मृतिस्तंभाची दखल ग्रामपंचायतीकडून घेतली जाते. स्मृतिस्तंभाभोवती सुशोभिकरणदेखील करण्यात आले आहे.
पाटणुस ग्रामपंचायत व कुंडलीका विद्यालयाच्या परिसरामध्ये हा स्मृतिस्तंभ आहे. त्यावर पांढर्या संगमरवरावर इंग्रजीमध्ये स्पष्टपणे कोरुन ठेवले आहे की पाटणूस गावातील 45 माणसे इ.स. 1914 ते 1919 या दरम्यान पहिल्या युद्धात लढण्यास गेली होती. मात्र, हे 45 हुतात्मे कोण होते याची कोणालाही माहिती नाही. सरकार दरबारीदेखील याची नोंद दिसत नाही.
पहिले महायुद्ध
हे जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युके/ब्रिटन, व इटली आणि अमेरिकेची संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रीया-हंगेरी, प्रशिया/जर्मनी, बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य) यांच्यात हे महायुद्ध झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. यामध्ये लाखो लोकांचा नरसंहार झाला.
भारतीयांचा सहभाग
युरोपसह आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडात तसेच प्रशांत महासागरात पहिले महायुद्ध लढले गेले. यामध्ये भारतातील दीड लाखाहून अधिक प्रशिक्षित जवान लाखो व्हॉलेंटिअर/स्वयंसेवक ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी झाले होते. यामध्ये 74 हजार 187 भारतीय जवान शहीद झाले. तर 67 हजारांहून अधिक भारतीय जखमी झाले.