बेकायदा पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर

। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पाच महिन्यांत 4,296 वाहनांवर बेकायदा ठिकाणी वाहने उभी केल्याने दंडाची कारवाई केली असून यामुळे वाहतूक विभागाकडे 4 लाख 35 हजार रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. या कारवाईनंतरही रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंगचा प्रश्‍न कायम आहे. यामुळे उद्योजकांकडून संताप व्यक्त होत आहे.


दुसरीकडे कारवाई होत असल्याने वाहनचालकही त्रस्त असून वाहनतळच नाही तर वाहने कुठे उभी करायची असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. असा पेच निर्माण झालेला असतानाही तेथील वाहनतळाचा प्रश्‍न सुटलेला नाही.साडेसातशेहून अधिक कारखाने तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. यामध्ये दिवसाला 20 हजारांहून अधिक वाहनांची ये-जा असते. सात हजारांहून अधिक अवजड वाहने दररोज ये-जा करतात. असे असताना वाहनतळच नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्त्यावर जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना घडत आहेत.


आठ महिन्यांपूर्वी दोन युवकांचा यामुळेच अपघातात बळी गेल्याची घटना घडली आहे. या घटनेतून कोणताही बोध घेतलेला नसून अजूनही वसाहतीमध्ये सर्वाधिक धोकादायक असलेली अमोनियाने भरलेले टँकर टीएमएचे कार्यालय असलेल्या रस्त्याकडेला दुतर्फा उभे केले जात आहेत. याचा लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याची तक्रार या परिसरातील उद्योजक व टीएमएचे सदस्य दिलीप परुळेकर यांनी केली आहे.दीपक फर्टिलायझर या कंपनीत अमोनिया घेऊन आलेले टँकर रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांची सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे तळोजा वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.

वाहनतळाची प्रतीक्षा कायम
तळोजामध्ये अवजड वाहनांसाठी वाहनतळाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. टीएमएच्या वतीने तळोजात वाहनतळ उभे करण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू असल्याचे टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी सांगितले. मात्र वाहनतळ उभारण्याचे काम सध्या संथगतीने सुरू असल्याचे येथील उद्योजकांचे मत आहे.

Exit mobile version