भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई विमानतळावरून दि.25 डिसेंबरपासून नियमित उड्डाणे सुरू करण्याची घोषणा होत असताना, या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र होत आहे. तसेच, आचारसंहितेचे कारण पुढे करून भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या लढ्याला स्थगिती दिली जाते. मात्र, विमान कंपन्यांचे उद्घाटन सोहळे, जाहिरातबाजी आणि उड्डाणांची तयारी यांना आचारसंहिता लागू होत नाही, हा सरळसरळ दुटप्पीपणा असल्याचा आरोप देखील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या असतील, तर त्या बदल्यात मिळणाऱ्या नोकऱ्या व व्यवसायही कायमस्वरूपीच मिळाले पाहिजेत. सारख्या खासगी एजन्सीमार्फत कंत्राटी कामगार भरती करून भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्यांच्या संघर्षामुळे नवी मुंबई उभी राहिली, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला कधी लागणार? विमानतळाचे उद्घाटन झाले, उड्डाणे देखील सुरू होत आहेत, मात्र नामकरणाच्या बाबतीत शासन मुद्दाम टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे. त्यामुळे नामकरणाच्या अस्मितेची लढाई आचारसंहिता संपल्यानंतर अधिक तीव्रतेने उभी राहीलच. मात्र, किमान नवी मुंबई विमानतळावरील कामगार भरतीत तरी भूमिपुत्रांची फसवणूक होऊ नये. यासाठी ‌‘बीव्हीजी हटाव-भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे’ ही मोहीम तात्काळ सुरू करावी, अशी मागणी भुमिपत्रांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version