पावसाळी अधिवेशनात आवाज उठविण्याची धुतूम सरपंचाची मागणी
। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई रेल्वे मार्गावरील धुतूम, नवघर, बोकडविरा रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, राज्य सरकारच्या माध्यमातून या रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला न गेल्याने उरण तालुक्यातील धुतूम, नवघर आणि बोकडविरा रेल्वे स्थानकांच्या नामकरणांचा प्रश्न अधांतरी लटकत पडला आहे. तरी उरणचे आ.महेश बालदी यांनी यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी केली आहे.
सरपंच सुचिता ठाकूर यांनी सांगितले की, मुंबई शहराच्या दिशेने जाणार्या नोकरदार, चाकरमानी, प्रवासी नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवी मुंबई- उरण या शहरांना जोडणारी रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असणार्या उरणमधील रेल्वे स्थानकांना देण्यात आलेली गावाची नावे ही स्थानिक ग्रामपंचायतीना विश्वासात घेऊन न देण्यात आल्याने धुतूम, नवघर आणि बोकडविरा रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पत्रही देण्यात आले.
परंतु, रेल्वे प्रशासनाकडून नामकरणासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर ही राज्य सरकारच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात न आल्याने संध्या उरणमधील धुतूम, नवघर आणि बोकडविरा रेल्वे स्थानकांच्या नामकरणांचा प्रश्न अधांतरी लटकत पडला आहे. तरी आ. महेश बालदी यांनी पावसाळी अधिवेशनात तालुक्यातील तीन रेल्वे स्थानकांच्या नामकरणासाठी आवाज उठवावा, अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.