सोन्याच्या धुरात विकास खुंटला

। रसायनी । वार्ताहर ।

गाव किंवा परिसरात एखादा मोठा कारखाना, प्रकल्प येतो तेव्हा तेथे विकासाची गंगा वाहू लागेल असे चित्र उभे केले जाते. रसायनी भागात 1962 च्या सुमारास एचओसी हा कारखाना आला. तेव्हा सोन्याचा धूर निघणार असे चित्र उभे करण्यात आले होते. पुढे कारखाने वाढत गेले, लोकवस्ती वाढली. परंतु, मूलभूत सुविधा धडपणे मिळाल्या नसल्याने कारखानदारीमुळे विकास झाला असे म्हणणे काहीसे धाडसाचे ठरेल. या परिसरात कोट्यवधींची उड्डाणे सुरू असताना रस्ते, पाणी, वीज या आघाड्यांवर आनंदी आनंद आहे.

एकेकाळी रसायनी हा विभाग मागासलेला होता. जंगलपट्ट्याने वेढलेला होता. भातशेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन होते. परंतु, मागास विभागांचा विकास करण्याच्या तत्कालीन केंद्रातील सरकारच्या धोरणानुसार महाकाय एचओसी कारखाना आला. रसायनी हे एखाद्या गावाचे नाव नाही तर तो एक विभाग आहे. एचओसीचा रासायनिक कारखाना आल्यानंतर या भागाला रसायनी असे नाव पडले आहे. या कंपनीसाठी 14 गावांची 1 हजार 500 एकर जमीन संपादन करण्यात आली. कालांतराने यातील काही जमीन एमआयडीसीकडे वर्ग झाली. जेथून सोन्याचा धूर निघणार असे सांगण्यात आले. परंतु, उद्यापही येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. पुढे या विभागातील कारखान्यांची संख्या वाढतच गेली.

या वाढत्या कारखानदारीमुळे बेरोजगरांना रोजगार मिळत असला तरी काही गावे, वस्त्यांतून पाणी, रस्ते या सुविधा धडपणे नाहीत. कारखानदारी भूमिपुत्रांच्या छाताडावर आणून बसवायची, मात्र यातून होणार्‍या विकासाची फळे दुसर्‍यांनी चाखायची हा अनुभव इतरत्रप्रमाणे येथेही आला आहे. राजकीय नेतेमंडळी यात कुठे तरी कमी पडत आहेत. वस्ती वाढली म्हणून अतिक्रमणे वाढली आहेत. याचा ताण नागरी सुविधांवर पडत आहे. यावर कुणी बोलले तर विकासाला विरोध होतोय असे चित्र रंगविण्यात येत आहे. याचा लाभ चाणाक्षांनी घेत स्वतःच्या तुंबड्या भरून घेत आहेत. यामुळे रसायनी विभागातून सोन्याच्या धुर जरी निघत असला तरी येथील विकास खुंटला असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version