यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव; 5,55,500 रुपयांची बक्षिसे
| चिरनेर | प्रतिनिधी |
शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, सचिव शुभांगी घरत यावेळी हजर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सायली संजीव यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
गोविंदा पथकांच्या उत्साहाला रिमझीम पावसाच्या सरींनी साथ दिली, त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला. थरांथर रचताना गोविंदा पथकांची चिकाटी आणि एकी दृष्ट लागण्याजोगी होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण, पनवेल आदी ठिकाणांहून सुमारे 60 गोविंदा पथकांनी सलामी दिली. कुणी चार थर, कुणी पाच, सहा, सात, आठ थरांपर्यंत मजल मारली. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला, तर दहीहंडी उत्सवात महिलांच्या गोविंदा पथकांची सलामी वाखाणण्याजोगी होती. सोबत शिवमुद्रा डान्स अकॅडमी पपण पाटील यांच्या नृत्याचा आविष्कार होता. अनेक नृत्यांगणांनी गोविंदा पथकांना आणि रसिकांना खिळवून ठेवले.
पहिला क्रमांक राघोबा देव गोविंदा पथक कोटनाका, उरण द्वितीय क्रमांक जरीमरी आई गोविंदा पथक, पिरकोन आणि आम्ही तुर्भेकर गोविंदा पथक, तुर्भे यांनी तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. यावेळी सायली संजीव म्हणाल्या, सर्व गोविंदा पथकांचे अभिनंदन आणि कौतुक करते, गोविंदा पथकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. महेंद्र घरत यांच्यासारखे दिलदार नेतृत्व या परिसराला लाभले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. शुभांगी आणि महेंद्र घरत हे अनोखे दाम्पत्य आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. आईच्या नावाने संस्था सुरू करून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. यावेळी महेंद्र घरत म्हणाले, यमुना सामाजिक संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. दहिहंडी हा त्याचाच भाग आहे, आपण संस्कृती जपण्यासाठी आणि टिकविण्यासाठी प्रयत्न करतोय; परंतु उत्सव साजरा करीत असताना कुणालाही दुखापत होऊ नये, याची काळजी घ्या. मी सदैव कलेला प्रोत्साहन देणारा आणि सन्मान करणारा आहे.
यावर्षी दहीहंडीसाठी 5 लाख 55 हजार 500 रुपये रोख बक्षीस आणि चषक ठेवण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उरण येथील प्रसिद्ध गोविंदा पथकांनी अवघ्या काही मिनिटांत पाच-सहा-सात-आठ लावले. विजेत्यांना 5,55,500 रुपयांची बक्षिसे
देण्यात आली.







