पावसाची दडी, शेतकरी हवालदिल

। उरण । वार्ताहर ।
सतत पडणारा पाऊस गेली सात दिवस अचानक गायब झाला आहे. त्यामुळे उरण तालुक्यात लागवडी खाली आलेली भातशेती पाण्याअभावी करपून जाणार की काय, या भीतीने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.

जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी भातलागवडीची खोळंबली कामे उरकून घेतली. परंतु, त्यानंतर सतत पडणारा पाऊस गेली सात दिवस अचानक गायब झाला. त्यामुळे पाण्याअभावी काही शेतकर्‍यांची भातलागवडीची कामे खोळंबली आहेत. त्यात चार दिवस उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतजमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही तर लागवडीखाली आलेली भातशेती पाण्याअभावी करपून जाईल, अशी चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे.

मुरूड तालुक्यात पावसाने मारली दडी
मुरूड तालुक्यात पावसाने मागील आठ दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत अडकला असून, त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. काही शेतकर्‍यांनी भातलावणी अद्याप केलेली नाही. त्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने भातलावणी अडकणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदर पावसाच्या खेळीमुळे तालुक्यातील शेतकरी चितेंच्या सावटात अटकला आहे. मुरुड तालुक्यात आतापर्यंत 1336 मि.मी. पाऊस पडला असून, त्याची माहिती मुरुड निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी दिली.

Exit mobile version