कुंभारकाम व्यवसायाला पावसाचा फटका

मडकी, चुली व मातीच्या साहित्याची विक्री थांबली, व्यावसायिक हवालदिल
। पाली/बेणसे ।
अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील कुंभारकाम व्यवसायाला फटका बसला आहे. अनेकांची मडकी, चुली व मातीच्या इतर वस्तू आणि मातीची खेळणी पावसामुळे खराब झाल्या आहेत. शिवाय पाऊस आणि गारवा असल्याने मडकी व चुलींची विक्री देखील थांबली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हा व्यवसाय पूर्ण डबघाईला आला होता. यावर्षी काही प्रमाणात व्यवसाय तग धरत असतांनाच अवकाळी पावसाने अवकृपा केली. पावसामुळे तयार वस्तू तर भिजल्याच पण मडकी व इतर मातीच्या वस्तू भाजण्यासाठी लागणारा पेंढा, लाकडे व कोळसा देखील भिजला आहे. त्यामुळे भट्टी लावणे अवघड झाले आहे. माती भिजल्याने ती पुन्हा वापरता येणार नाही. मालाला उठाव सुद्धा मिळत नाही. त्यात झालेले नुकसान यामुळे खूप वाताहत होत आहे. तसेच काही माल प्लास्टिक आच्छादून ठेवला आहे. पाऊस आणखी लांबल्यास त्या वस्तू देखील खराब होण्याची भीती आहे.

Exit mobile version