सूर्यप्रकाश मिळत नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव; कृषी सहाय्यकांचे औषध फवारणीचे आवाहन
| चिरनेर | प्रतिनिधी |
मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे भात शेतीला सुरळीच्या अळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, भातशेती आडवी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाने काही दिवस दडी मारल्याने उष्णता वाढली होती. मात्र सध्या सततच्या पावसामुळे भात पिकांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे. महिन्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी अगदी मेहनतीने उभे केलेले पीक सध्या धोक्यात आले आहे. यावर शासन आणि कृषी विभागाने उपाययोजना करण्याचा विचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एकेकाळी उरण तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र वाढत्या औद्योगिक कारणामुळे तालुक्यात भात शेतीच्या लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. उरण तालुक्यात आजही पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. मात्र पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी खरीपाची भात पेरणी जशी हवी तशी न झाल्यामुळे भाताची रोपे उगवलीच नाहीत. मूळ पेरणीला संधी न मिळाल्याने शेतीला सूर्यकिरणांची उब आवश्यक असताना, ती मिळालीच नाही. त्यामुळे रोपे कमकुवत झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशीबशी शेतीची लागवड पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने एवढा कहर केला की, भातपिके गारठून गेली आहेत. जमिनीत सतत ओलावा राहिल्यामुळे, भात पिके फारसी फोफावलेली दिसत नाहीत. महागडे बियाणे, वाढत्या मजुरीचे दर आणि आता भात पिकांना सुरळीच्या अळ्यांचा धोका यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.भात पिकांची हिरवीपाती तपकिरी रंगाची होत असल्याचे शेतकऱ्यांनी उरणच्या कृषी विभागाला कळविले आले आहे. दरम्यान पाऊस थांबून भात पिकांना सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात मिळाला. तर भातपिके रोगाला सहसा बळी पडणार नसल्याचे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे.
शेतात पाणी साचून राहिल्याने भात पिकांवर सुरळीच्या अळी पडत असतील तर कृषी सेवा कार्यालयाकडून विशिष्ट औषधांची फवारणी करावी. यासाठी उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात याबाबतचा तक्ता लावण्यात आला आहे.
सुषमा गायकवाड
कृषी सहाय्यक अधिकारी चिरनेर







