रत्नागिरी – सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर


खा.श्रीनिवास पाटील यांचे प्रयत्न
चिपळूण | प्रतिनिधी |
कांदाटी खोर्‍यातील उचाट ते शिंदी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी खासदार श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाने वन विभागाला सादर केला आहे.त्यामुळे या कामासाठी गती मिळाली आहे.हा रस्ता पूर्ण झाल्यास रतगिरी,सातारा जिल्हा परस्परांना जोडले जाणार आहेत.

सन 1980 पूर्वीपासून अस्तिवात असणारा चतुरबेट ते शिंदी या रस्त्यापकी उचाट ते शिंदी हा 20 किलोमीटर अंतराचा रस्ता हा कोयना अभयारण्यात असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण रखडलेले होते. परंतु नुकतेच केंद्र शासनाने 1980 पूर्वीच्या रस्त्यांचे डांबरीकरण राज्य सरकारच्या मान्यतेने करावे,असा आदेश पारित केला आहे.त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी श्रीनिवास पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यावेळी उचाट ते शिंदी रस्त्याला मान्यता द्यावी अशी सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली होती. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार यांनातसा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाचे ( पश्‍चिम ) कार्यकारी अभियंत्यांनी उचाट ते शिंदी या कोयना अभयारण्यातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव तयार केला आहे.तो प्रस्ताव मंजुरीसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे सादर केला आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून हा प्रस्ताव नागपूर येथे प्रधान मुख्य वन संरक्षकांकडे मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे . एकंदरीत उचाट ते शिंदीदरम्यानच्या रस्त्याच्या कामाला वेग आला आहे.यामुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्हयातील प्रवास सुलभ व कमी वेळेत होण्यास मदत होणार आहे.

पर्यटनाला मोठी चालना मिळणार
कांदाटी खोर्‍यात उचाट ते शिंदी रस्त्याचे डांबरीकरण होण्यामुळे या भागातील दळणवळण व पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.पुरातन शिवकालीन मंदिरे असणार्‍या चकदेव व पर्वत येथे जाण्यासाठीही या रस्त्याचा उपयोग होणार आहे . त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटदेखील त्यामुळे जोडला जाणार आहे.यासाठी उत्तर रत्नागिरीतील खेड तालुका येत असलेल्या मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी देखील यासाठी पुढाकार घेतल्यास लवकरच रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग उदयास येईल.यामुळे मार्गावरील गावातून आर्थिक दळणवळण होण्यास मदत ठरणार असून याभागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.

Exit mobile version