रवाळजे रस्त्याच्याकडेला घाणीचे साम्राज्य

। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडीपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या रवाळजे फाट्यानजीक रस्त्यावर कचर्‍याचा मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर टाकाऊ वस्तूंचा खच दिसत आहे. या कचर्‍यामध्ये अनेक प्रकारचा प्लास्टिक तसेच बिअरच्या बॉटल प्लास्टिकच्या पिशव्यांमधून बांधून टाकण्यात आलेल्या दिसत आहेत. विळे-भागाड येथे कंपन्या असल्यामुळे तसेच येथून पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे लहान मोठी वाहने तसेच अवजड वाहन सातत्याने धावत असतात. रस्त्याच्या बाजूलाच प्रथम दर्शनी भागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. या घाणीवर उनाड गुरे मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस ताव मारत असतात. प्लास्टिकची वस्तू लवकर विरघळत नाही त्यामुळे ती गुरांच्या पोटात गेली तर गुरांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. कधी कधी किमती गुरे दगावतात. त्यामुळे येथून येणा-जाणार्‍या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास होत असतो. यावर ग्रामपंचायतीने लक्ष देण्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version