उरणमध्ये लालबावटा फडकवणारच

शेकापकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

राज्यात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. अशा परिस्थितीत आपण निवडून येणारच अशा ठिकाणी विविध पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

रायगडमधील उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत होणार आहे. यावेळी आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडीकडून उरणमधून शेतकरी कामगार पक्षालाच तिकीट मिळेल या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा क्षेत्रात कंबर कसली आहे.

गणेशोत्सवामध्ये जनतेच्या भेटीसाठी घेण्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उरणचे विधानसभेचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून आपण केलेले काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच आज शेतकरी कामगार पक्षाला नवचैतन्य निर्माण झाले आहे. खालापूर, पनवेल आणि उरण या तिन्ही तालुक्यांमध्ये येणार्‍या गावांमध्ये भेटी देण्यात प्रितम म्हात्रे आघाडीवर आहेत. भेटीदरम्यान तरुणवर्गात त्यांच्या उमेदवारीबद्दल असलेला उत्साह शेतकरी कामगार पक्षातील तरुणांसोबतच आघाडीमधील इतर पक्षीय कार्यकर्त्यांमध्येसुद्धा दिसून येत आहे.

या सर्व घडामोडीदरम्यान पक्षसंघटना बांधणीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने प्रितम म्हात्रे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जेएनपीटी टाऊनशिप हॉल, उरण येथे पक्षात नव्याने प्रवेशकर्ते झालेले आणि अनुभवी असलेले जुने कार्यकर्ते यांचा नव्याने पक्षबांधणी करतानाच नवनियुक्त पदाधिकारी मेळावा माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेकाप नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. यावेळी जास्तीत जास्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी केले आहे.

उरण विधानसभा हा आमचा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काही काळासाठी आमचा निसटता पराभव झाल्याने ही जागा पुन्हा मोर्चेबांधणी करून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार महाविकास आघाडीच्या रूपाने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. लवकरच उरण विधानसभेवर लालबावटा फडकला जाईल.

प्रितम म्हात्रे, खजिनदार
शेतकरी कामगार पक्ष रायगड

Exit mobile version