मानिव अभिहस्तांतरण मोहीम

 | अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेची इमारत सहकारी संस्था म्हणून ज्या जमिनीवर नोंदणीकृत आहे, ती जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी मानिव अभिहस्तांतरण मोहीम शासनाच्या सहकार विभागा मार्फत सुरू केली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील 31 मार्च अखेर 498 नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. यापैकी अगदी कमी प्रमाणात गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अभिहस्तांतरण झाले आहे.

सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था, पुणे यांच्या परिपत्रकानुसार निर्गमित परिपत्रकीय सूचना तथा शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीची मालकी ही त्या संस्थेच्या नावे हस्तांतरित होणे यालाच अभिहस्तांतरण असे म्हणतात. तथापि विकासक यांच्या असहकारामुळे किंवा संस्थेतील पदाधिकारी व सदनिकाधारक यांच्या अज्ञानामुळे किंवा याबाबत त्यांना ज्ञान न मिळाल्यामुळे आपल्या संस्थेची इमारत ज्या भूमीवर उभी आहे, त्या भूमीचे क्षेत्र आपल्या (संस्थेच्या) मालकीचे व्हावे यासाठी, नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांचे मानिव हस्तांतरण मोहिमेला प्राधान्याने चालना देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.

अलिबाग तालुक्यातील ज्या संस्थांचे मानिव अभिहस्तांतरण झालेले नाही त्यांनी आपल्या संस्थेची माहिती लेखी पत्राद्वारे व संपर्क क्रमांकासह या कार्यालयास अवगत करावे. तसेच सदर पत्र व्यवहार या कार्यालयाच्या arcsšalibag@rediffmail.com या ईमेलवर करून प्रत्यक्ष संपर्क साधावा, जेणेकरून शासनाचे ध्येय धोरण राबविण्यास गृहनिर्माण सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अलिबाग यांचे कार्यालय ब्राह्मण उत्कर्ष मंडळ इमारत, पहिला मजला, ब्राह्मणआळी, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे तालुका अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अलिबाग  अशोक धो.मोरे यांनी कळविले आहे.

Exit mobile version