। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांची राष्ट्रीय सहकारी संघ या शिखर संस्थेच्या संचालक मंडळावर केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असे स्वरूप राष्ट्रीय सहकारी संघाचे आहे. देशभरातील सहकारी संस्थांना प्रशिक्षण आणि क्षमता विकास करण्याचे मुख्य काम राष्ट्रीय संघामार्फत केले जाते.
राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली मुख्यालयामार्फत सर्व प्रदेशांमधील राज्य सहकारी संघांचा समन्वय साधला जातो. डॉ. जोशी यांची नियुक्ती 11 जानेवारी रोजी म्हणजेच सहकार भारतीच्या स्थापना दिवशी करण्यात आली यास विशेष महत्व आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सहकाराबाबतची सर्व ध्येय धोरणे निश्चित करण्याचे काम करते. संपूर्ण सहकार क्षेत्राने डॉ. उदय जोशी यांचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय सहकारी संघाच्या कामकाजामध्ये गुणात्मक परिवर्तन होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.