पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची उपस्थिती
| रायगड| जिल्हा प्रतिनिधी |
शोषित, पीडित, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या कृषीवलच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.28) मोठ्या उत्साहात झाले. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सायंकाळी कृषीवलच्या कार्यालयात पार पडला. यावेळी आंचल दलाल यांनी कृषीवल दिवाळी अंकाचे कौतुक केले.

यावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत, सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, जिल्हा प्रतिनिधी प्रमोद जाधव, डिजिटल उपसंपादक संतोष राऊळ, मुख्य आर्टिस्ट केदार गुरव, शुभांगी गुळेकर, कल्याणी भगत (मांडवकर), सानिका पाटील- म्हात्रे, वैष्णवी वाडकर आदी उपस्थित होते.
दिवाळी अंकाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा कृषीवलने जपली आहे. यावर्षी स्थानिक लेखकांसह दिग्गज लेखकांचे लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राजकीय, इतिहास, मी साक्षीदार, रायगडची उद्योगनगरी, कथाकथन, मनोरंजन, रणांगण, व्यक्तिविशेष, धार्मिक, भ्रमंती, निसर्ग, पर्यावरण, भविष्यवेध कविता, अशा विविध विभागांमध्ये माहितीपूर्ण लेख आहेत. शिक्षण, आरोग्य, बदलते युग, इर्शाळवाडी दरड, सावित्री पूल अपघात, अलिबागमधील फटाका फॅक्टरी अशा घडामोडींवर देखील लिखाण केले आहे.

यावर्षीच्या दिवाळी अंकात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी धर्माच्या आडून सुरू असलेले राजकारण, पसरवत असलेला दहशतवाद याविषयी परखड शब्दात आपले मत व्यक्त केले आहे. राज्याच्या राजकारणात पुरोगामीत्वाची ओळख पुसण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्याविषयी कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी विशेष लेख लिहिला आहे. कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील यांच्याविषयीचा अभ्यासपूर्ण लेख सर्वेश तरे यांनी लिहून समाजासाठी त्यांचे कार्य किती महान होते, याची वाचकांना ओळख करुन दिली आहे. आगामी काळ निवडणुकांचा असल्याने राज्यातील लहान-मोठ्या अशा सर्वच पक्षांची पत्रकार अशोक अडसूळ यांनी थोडक्यात ओळख करुन दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांविषयी विलास फडके यांनी लेखाच्या माध्यमातून उत्तम मांडणी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष आणि पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास याविषयी आनंद कोळगावकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सुधाकर लाड, नाना करंजुले यांनीही शेकापविषयी आपले विचार मांडले आहेत. डॉ. शमिका सरवणकर, सुखद राणे यांनी किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत मिळालेले स्थान आणि राज्य आणि केंद्र सरकारची वाढलेली जबाबदारी याविषयी अभ्यासपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून केली आहे.

रायगडसह कोकणातील माहिती, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा. पाटील यांचे नाव, उरणची वाटचाल दुसऱ्या आर्थिक राजधानीकडे, महाविद्यालयातील निवडणुकीचे राजकारण अशा अनेक विषयांवर लिखाण करण्यात आले आहे. दिवाळी अंकात सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी साहित्यविश्वामध्ये कृषीवल दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा आहे. गेली 89 वर्षांची परंपरा असलेल्या कृषीवलने दिवाळी अंकाच्या माध्यमातून दर्जेदार साहित्यांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. कसदार साहित्यमूल्य असलेले लेखक आणि त्यांचे उत्तमोत्तम साहित्य वाचकांना उपलब्ध करून देण्याची परंपरा कृषीवलने यावर्षीही जपली आहे.
दिवाळी अंकासाठी कार्यकारी संपादक माधवी सावंत, सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अंकाचे संपादन सहाय्य, मुद्रितशोधन राकेश लोहार यांनी तर कला संपादन केदार गुरव यांनी केले. संपादकीय विभागातील सुयोग आंग्रे, वैभव पाटील, प्रमोद जाधव, संतोष राऊळ, व्यवस्थापकीय विभागातील रुपेश पाटील, हर्षा पाटील, जाहिरात विभागातील सचिन गुप्ता, वितरण व लेखा विभागातील दर्शना पाटील, अंकित भानुशाली, भैरवी पाटील-जाधव, सुरेंद्र वेळे, हिरेन राठोड, स्वप्नाली टोपले, नेहा भगत, रोशन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जाहिरात निर्मिती शुभांगी गुळेकर, प्रदीप ठाकूर यांनी केली आहे. निर्मिती सहाय्य मानसी गोतावडे, कल्याणी भगत, सानिका म्हात्रे, अंतरा पारंगे, वैष्णवी वाडकर यांनी केले. मुद्रण व्यवस्था सदाशिव पवार, संजय साहू, महेश भायजे, चंद्रकांत कवाड, अमरनाथ म्हात्रे, सुधाकर राऊत, संजय पाटील, जय रातवडकर, अस्मिता वेळे, आरती राजाणे, नमिता घाटकर, मंजुळा कावजी यांनी केले.







