| रेवदंडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 2974 मच्छिमार नौका सुरक्षितपणे किनाऱ्यावर परतल्या आहेत. सध्या कोणतीही नौका बेपत्ता नसल्याची खात्री मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेवदंडा-अलिबाग परिसरात मच्छिमारांनी वेळेवर नौका बंदरात आणल्याने मोठा दिलासा जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे.
स्थानिक बंदरावर मच्छिमारांनी नौका सुरक्षित ठेवत हवामान सुधारण्याची प्रतीक्षा सुरु केली आहे. सतत येणाऱ्या वादळाच्या इशाऱ्यांमुळे सागरी सुरक्षा दल आणि मत्स्य व्यवसाय विभागाने किनाऱ्यावर चौकस नजर ठेवली आहे. श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, अलिबाग आणि उरण तालुक्यातील सर्व बंदरांवर नौका नांगरून आहेत. मुरुड-जंजिरा तालुक्यात 700, श्रीवर्धनमध्ये 1019, अलिबागमध्ये 800 आणि उरण तालुक्यात 450 नौका सुरक्षित आहेत. करंजा बंदरातून आणखी पाच नौका संध्याकाळपर्यंत परत येणार आहेत, अशी माहिती स्थानिक मच्छिमार संस्थेने दिली. सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड यांनी सांगितले की, खोल समुद्रात जाणे सध्या टाळावे. मच्छिमारांनी हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. विभागाने सर्व मच्छिमार सहकारी संस्थांना सतर्कतेचा इशारा देऊन किनाऱ्यावर आवश्यक तयारी ठेवण्यास सांगितले आहे. स्थानिक पातळीवर रेवदंडा-अलिबाग किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सतर्कता वाढवण्यात आली असून, गावकऱ्यांनी एकजुटीने तयार ठेव केली आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी गर्दी न करता सुरक्षित ठिकाणीच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आगामी 24 तास हवामान बदलते राहण्याची शक्यता असून विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे.





