सुरगडावरुन अमेरिकेच्या ज्येष्ठ नागरिकाची सुटका

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा मदतीचा हात
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मुंबई- गोवा महामार्गावर रोहा तालुक्यातील वैजनाथ गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी कड्यावरून क्लायंबिंगच्या साह्याने त्यांना सुखरूप खाली उतरविले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की संजय साळुंखे (वय 60) हे खांब गावातील रहिवासी असून सध्या त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. मागील काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या डाव्या पायाला प्रचंड इजा झाली होती. डावा पाय कमकुवत झाला आहे. ते काही दिवसांपूर्वी आपल्या मुळ गावी खांब इथे आले होते. ते सुरगडावर भटकंती करण्यासाठी गेले. गड न्याहाळून परतीचा प्रवास करत असतांना उंच कड्यावरून उतरण्यास त्यांचे मन धजावत नव्हते.

अशा प्रसंगी त्यांनी माणगाव तालुक्यातील आपल्या जिवलग मित्राला घटनेची माहिती दिली. त्यांच्या मित्राने महेश सानप यांना घटनेची माहिती दिली. मात्र महेश सानप हे कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्याने त्यांनी रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांना संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. संस्थेच्या सर्व सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साळुंखे यांना कड्यावरून क्लायंबिंगच्या सह्याने सुखरूप खाली आणले. साळुंखे यांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड चे आभार मानले.

Exit mobile version