। उरण । वार्ताहर ।
उंची रोधकामुळे उरण-पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बससेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. हे उंची रोधक सोमवारी रात्री अखेर हटविण्यात आले आहेत. त्यामुळे बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आणि पाणजे येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल आनंदही व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण-पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले उंचीरोधक हटविण्याची अधिसूचना काढल्याने उंचीरोधक लवकरात लवकर हटविण्याची मागणी करण्यात येत होती. अखेरीस रात्रीच्या वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंचीरोधक हटविण्यात आले आहेत. उंचीरोधकामुळे मागील तीन वर्षांपासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेनंतर सिडकोने उरण- पनवेल मार्गावर बसविण्यात आलेले बोकडवीरा आणि फुंडे हायस्कूलनजीकचे उंचीरोधक हटविण्यात आले आहेत. शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उंचीरोधक हटवण्याची मागणी केली होती.खाडीपूल दुरुस्तीसाठी बोकडवीरा ग्रामस्थ आणि जनवादी महिला संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आहे. 2021 सालापासून उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे येथील बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावातील हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. मागील तीन वर्षांपासून बोकडवीरा मार्गे बंद करण्यात आलेली एसटी बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी हेमलता पाटील यांनी केली आहे.