। बेळगाव । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करताना यावेळी त्यांची दमछाक झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली तेवढी मते यावेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ आमदारांपैकी पाच, तर चिक्कोडी मतदारसंघातही आठपैकी पाच काँग्रेस आमदार आहेत. कारवारमधील दोन आमदारांपैकी एक कॉँग्रेस व एक भाजपचे आहेत. मंगळवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर या आमदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आकडेमोड सुरू केली आहे. आमदारांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर, राजू सेठ, महांतेश कौजलगी, विश्वास वैद्य व अशोक पट्टण हे पाच काँग्रेस आमदार आहेत. तर अभय पाटील, रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे तीन भाजपचे आमदार आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. पक्षाने त्यांचे सुपुत्र मृणाल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मृणाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हेब्बाळकर या पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत. त्यांना उर्वरित चारही आमदारांची साथ मिळाली आहे. पण, त्या आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांची साथ मिळणार का? हा प्रश्न आहे. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांची भिस्त तीन आमदारांवर आहे. यापैकी भालचंद्र व रमेश जारकीहोळी मतदारसंघातच आहेत, शिवाय त्यांनी शेट्टर यांचा जोरदार प्रचारही केला आहे. अभय पाटील यांच्याकडे पक्षाने तेलंगणची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे त्यांना प्रचारात फारसा सहभाग घेता आलेला नाही, पण या तीन आमदारांकडून किती मताधिक्य दिले जाणार? याकडे जाणकारांचे लक्ष आहे.