अपहरण केलेल्या सख्ख्या बहिणींची सुटका; आरोपीस ठोकल्या बेड्या

| चौल | प्रतिनिधी |

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्ली येथून अल्पवयीन दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करणार्‍या कादंबरी नामक महिला आरोपीला रेवदंडा पोलिसांनी जेरबंद करुन दोन्ही मुलींची सुटका केली. संबंधित मुलींना आईवडिलांच्या ताब्यात दिले असून, महिला आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात 10 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये संशयित महिला आरोपी हिने पळवून नेले असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती.

रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशांत भोईर, सुषमा भोईर हे अधिक तपास करीत होते. सोबत पोलीस शिपाई दुमारे, राकेश मेहेतर, अभियंती मोकल तसेच पोलीस मित्र धनजय मुंबईकर यांचे पथक तयार करून दोन अल्पवयीन मुलीचा तपास सुरू केला. संशयित महिला मुलींना घेऊन एकविरा परिसरात लपून बसल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना ही बाब सांगितली असता ताबडतोब रेवदंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने एकविरा येथे जाऊन शिताफीने दोन अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जाणारी कादंबरी नामक आरोपीस 15 ऑक्टोबर रोजी अटक करीत मुलींची सुखरूप सुटका केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेवदंडा पोलिसांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version