पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला प्राधान्य देण्याचा कल
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला प्राधान्य देण्याचा कल नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे.
खांदा कॉलनी येथील खांदेश्वर मंदिर परिसरातील खांदेश्वर सरोवराच्या काठावर एका घरातील मित्र-मैत्रिणींनी आपल्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः लाल मातीपासून साकारण्यास सुरुवात केली आहे. ‘आमच्या घरातील बाप्पा इको फ्रेंडली’ असा संकल्प करत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गणेशमूर्ती तयार करताना लाल मातीचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बाप्पाची मूर्ती साकारली जात आहे. आपल्या उत्सवातून पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या तुलनेत मातीच्या मूर्तींकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि मातीच्या मूर्तींच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. लाल मातीपासून तयार केलेली मूर्ती विसर्जनानंतर पर्यावरणावर कमी परिणाम करणारी ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करून गणेशमूर्तीची निवड करावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दरवर्षी वाढणारे तापमान, कमी होत जाणारी झाडांची संख्या आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. ‘आज पर्यावरण वाचवले तरच उद्याच्या पिढीला शुद्ध हवा मिळेल,’ या भावनेतून घरगुती गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी जपण्याचा उत्सव ठरावा, अशी अपेक्षाही या तरुणांनी व्यक्त केली. खांदेश्वर सरोवराच्या काठावर लाल मातीने बाप्पाची मूर्ती साकारताना दिसलेले हे चित्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बाप्पा घरी आणूया, पण निसर्गालाही जपूया’, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
पर्यावरणासाठी हानिकारक
गणेशोत्सव सार्वजनिक आणि घरगुती पद्धतीने मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. वर्षागणिक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात वाढ होताना दिसत आहे. सामान्यतः नागरिक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेतात. मात्र, पीओपी पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने शाडूपासून घडवलेल्या गणेशमूर्तींसाठी पर्यावरणवादी संस्था जागरुकता निर्माण करत आहेत.







