| माणगाव | प्रतिनिधी |
गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळा, माणगाव येथील विद्यार्थ्यांनी ‘द ड्रिम’ आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रिमियम विविध कला स्पर्धांमध्ये आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही स्पर्धा दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाली होती. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेला हा सन्मान शाळेसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी रेखांकन, रंगकाम, कार्टून बनवणे, हस्तलेखन, तसेच क्राफ्ट मेकिंग अशा विविध कला प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पुरस्कार पटकावले. स्वरा उदय मोरे (इयत्ता 9वी) रेखांकन व रंगकाम या स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावत स्मृतिचिन्ह मिळवले. स्वरा प्रदीप गायकवाड (इयत्ता 6वी) कार्टून बनवणे या प्रकारात स्टार अवॉर्ड मिळवत सुवर्णपदक आणि भेटवस्तू प्राप्त केली. स्मित महेंद्र नाईककर (इयत्ता 6वी) रंग भरणे या प्रकारात गोल्डन अवॉर्ड पटकावला. मृदा सुहास सावंत (इयत्ता 7वी) रंग भरणे स्पर्धेत गोल्डन अवॉर्ड मिळवला. तन्वी राकेश पोवार (इयत्ता 9वी) हस्तलेखनात गोल्डन अवॉर्ड मिळवत आपली सुंदर अक्षरकला सिद्ध केली. श्रावणी विवेक काटोलकर (इयत्ता 8वी) रंग भरणे या प्रकारात गोल्डन अवॉर्ड मिळवला. रोहित सुनील गोळे (इयत्ता 7वी) रंग भरणे स्पर्धेत गोल्डन अवॉर्ड पटकावला. मिताली रघुनाथ जगदाळे (इयत्ता 6वी) हस्तलेखनात गोल्डन अवॉर्ड मिळवला. अनन्या जी. तावडे (इयत्ता 9वी) क्राफ्ट मेकिंगमध्ये गोल्डन अवॉर्ड मिळवत उत्कृष्ट सर्जनशीलता दाखवली. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा नावलौकिक उंचावला असून पालक व शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीमागे त्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा मोरे, कलाशिक्षक अनंत सावंत व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे भविष्यात आणखी मोठ्या उंची गाठण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.







