। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याच्या लढतीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एका बाजूला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाच वेळा विजेता झालेला संघ अशा अव्वल संघांमध्ये ही लढत रविवारी (दि.19) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
क्रिकेट सामन्यांमध्ये नाणेफेक ही फार महत्त्वाची ठरते. मैदानावरील कामगिरी सोबत अनेक संघाचे नशिब नाणेफेकीवर देखील ठरते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याआधी खेळपट्टीसोबत सर्वाधिक चर्चा होत आहे ती नाणेफेकीवरून. अनेक वेळा अशी परिस्थिती असते की नाणेफेकीच्या वेळीच कोणता संघ विजयी होणार हे नक्की होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 11 खेळपट्ट्या आहेत. आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की कोणत्या खेळपट्टीवर अंतिम सामना होणार आहे. पण सामना अशा खेळपट्टीवर होईल जेथे फिरकीपटूंना मदत मिळेल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सामना जस जसा पुढे जाईल तसे फलंदाजी करणे अवघड होईल.
क्रिकेटमध्ये नेहमी असे म्हटले जाते की, मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करावी. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना अनेकवेळा जास्त दबाव येतो. 1983 साली भारताने 183 धावा करून विजेतेपद मिळवले होते. 2019 साली इंग्लंडला आक्रमक फलंदाजी असताना देखील 242 धावा करता आल्या नव्हत्या. अखेर सामना बरोबरीत झाला आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. त्यामुळे 2023च्या अंतिम सामन्यात दोन्ही कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.