तालुक्यात भातपिकासाठी पावसाची गरज
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
रायगडात भाताचे पीक उत्तम तरारत असले तरी पुढच्या कापणीसाठी भात तयार होईपर्यंत पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे, असे मत मुरूड परिसरातील अनेक शेतकर्यांनी व्यक्त केले आहे. हवामान खात्यानेदेखील दिलेल्या माहितीनुसार राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असून, रायगड जिल्ह्याचादेखील समावेश आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन महाराष्ट्राकडे सरकत असल्याने शनिवारपासून पावसाचे अनुकूल वातावरण तयार होत असून, सोमवारपासून पावसाची तीव्रता वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुरूड तालुक्यात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुरूड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी सांगितले की, मुरूड तालुक्यात 3210 हेक्टर जमिनीवर भातलागवड केली जाते. तालुक्यात यंदा उत्तम भातपीक आले आहे. सुवर्णा, वाडा कोलम, जया, जोकर अशा प्रकारातील भात जातीचे पीक लावले जाते. बोर्ली मांडला पंचक्रोशीत अधिक प्रमाणात भातपीक घेतले जाते. बदलते हवामान किंवा अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान होते. यासाठी शेतकरी बांधवांनी पीक विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वाणदे गावचे शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले की, सध्या काही ठिकाणी भात पिकावर खोड किड्याचा प्रादुर्भाव झाला असून, फवारणी करावी लागेल असे वाटते.
तहसील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मुरूड तालुक्यात आतापर्यंत 2809 मिमी पाऊस पडला आहे. शिघ्रे गावचे शेतकरी रघुनाथ माळी यांनी सांगितले की, उखारू भातपीक अद्याप तयार झालेले दिसून येत नाही. पिकाला अजूनही पावसाची गरज आहे. भातपीक तयार होण्यासाठी भरपूर वेळ आहे. तापमान वाढते असल्याने आगामी काही दिवसात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे खारआंबोली, शिघ्रे, विहूर, वावडुंगी, तेलवडे भागातील शेतकर्यांनी सांगितले. सध्या तालुक्यातील तापमान 28 ते 29 सेल्सियस आहे.