। मुरूड । वार्ताहर ।
रविवारी सायंकाळी उशिरा विजेच्या प्रचंड कडकडाटासह आलेल्या परतीच्या पावसाने मुरूड परिसराला झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने परिसर अंधारात बुडून गेला. नवरात्रोत्सव संपल्याने रविवार मोकळा वार होता. त्यामुळे सायंकाळी बाजारहाट करण्यासाठी बाजार पेठमध्ये मोठी वर्दळ होती.
सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या पावसाने नागरिक भयभीत झाले. सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर पाऊस सुरू झाला. रात्री साडेआठपर्यंत पाऊस सुरूच होता. खंडित झालेला वीज पुरवठा पाऊस थांबल्याने रात्री पूर्ववत सुरू झाला. पावसामुळे तयार झालेल्या भात शेतीस धोका निर्माण झाल्याचे शेतकरी बांधवानी सांगितले. मुसळधार पावसामुळे मुरुड शहरात अनेक मार्गावर पाण्याचे ओहोळ वाहत होते. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मुरूड तालुका दोन तास अंधारात बुडाला होता.