| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील एका फार्म हाऊसमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेले होते. त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कर्जतच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला ती रिव्हॉल्व्हर घेऊन पळालेले आरोपी हे उत्तर प्रदेशात गेले असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेवाडी येथील अरुण मोहिते यांच्या सृष्टी फार्म हाऊस बंगल्याच्या किचनच्या खिडकीतून चोरट्यांनी आंत प्रवेश केला होता. त्यांनतर बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकवून कपाटामध्ये ठेवलेले एक 32 बोअरचे स्मिथ ॲण्ड बेसन (मेड इन युएसए) बनावटीचे रिव्हॉल्व्हर व चार जिवंत बुलेट असा एकूण 1 लाख 108 रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरून नेला होता. चोरट्यांनी चोरलेल्या रिव्हॉल्व्हरने एखादा गंभीर गुन्हा घडू नये याकरिता त्यांचा जलदगतीने शोध घेऊन त्यांना अटक करणे अतिशय आवश्यक होते. त्यानुसार अरुण मोहिते यांची सर्व प्रथम सखोल तपास करुन बंगल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची तसेच बंगल्यावर काम केलेल्या अलीकडच्या काळातील कामगारांची माहिती संकलीत केली. त्यानंतर त्या सर्वांच्या घटनेच्या दिवशीच्या व घटनेच्या नंतरच्या हालचाली तपासल्यानंतर संशयितांची माहिती पोलिसांनी झाली. त्यांनतर कर्जत पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. तसेच, पकडण्यात आलेले आरोपी अरविंद अमरजित चौहान आणि अंगद फुलचंद वनवासी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती कर्जत पोलिसांच्या पथकाने दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे तसेच पोलीस उप अधीक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन कर्जतचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हि कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण केली. त्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, किरण नवले, सुशांत वरक या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी समीर भोईर, विठ्ठल घावस, स्वप्नील येरुणकर, प्रवीण भलेलेरो, सौरभ पाटील यांचा समावेश होता.
पोलिसांचे आवाहन
आपल्या ताब्यातील किमती व मौल्यवान साहित्यांच्या सुरक्षेच्या संबंधाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे हॉटेल, फार्म हाऊस, इमारत बांधकाम व दुरुस्ती अशा प्रकारच्या कामाकरिता येणाऱ्या स्थानिक तसेच परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती, आधारकार्डच्या प्रति आपल्याकडे घेऊन त्याबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावी, असे आवाहन कर्जत पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
