| पंढरपूर | प्रतिनिधी |
पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील आढेगाव या गावात 14 वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे वडील सशस्त्र सीमा बलामध्ये कामाला आहेत. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव श्रीधर गणेश नष्टे असे आहे. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून कार्यरत आहेत. गणेश नष्टे, त्यांची पत्नी सारिका, दोन मुलं (श्रीधर आणि श्रेयस) हे आढेगावमध्ये वास्तव्याला आहेत. ही घटना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सशस्त्र सीमा बलात कार्यरत गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. ते जेव्हा गावी घरी येतात, तेव्हाही त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असते. हेच रिव्हॉल्व्हर वापरुन 14 वर्षीय श्रीधर नष्टेने आत्महत्या केली. सोमवारी (दि.27) रोजी दुपारच्या सुमारास श्रीधरने रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. शाळेत जाणाऱ्या 14 वर्षाच्या श्रीधरच्या आत्महत्या करण्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.