उजवातीर अष्टमी कालव्याला खांड

| कोलाड | प्रतिनिधी |

रायगडसह रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवस मुसळधार पावसाने हाहाकार उडविला आहे. नदी नाले तुडूंब झाले. एवढेच नाही तर मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती जलमय झाली. तर डोळवहाल बंधारा तसेच कुंडलीकेतून बारमाही वाहणारा उजवातीर अष्टमी कालव्याला देवकान्हेनजीक मुसळधार पावसामुळे भली मोठी खांड गेली. त्यामुळे पुराच्या पाण्यातून वाहून आलेले दगड-माती-गाळ हा खालील संपूर्ण शेत जमिनीत गेला. परिणामी येथील शेकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी सज्ज केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरी यावर पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

आधीच पावसाला उशिराने सुरूवात झाल्याने अनेकांनी खरीप हंगामातील पेरणी उशिराने केली. तर पाऊस सुरू होताच काही शेतकऱ्यांनी भाताची पेरणी करून शेतात लागवडीसाठी अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने नांगरणी सुरू केली. परंतु, मागील काही चार पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेकांचे पेरलेले भात वाहून गेले. तर अधिकची पूरपरिस्थिती उद्भवल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. काही शेतात पुरामुळे मातीचा गाळ बसल्याने ती लागवडीसाठी पुन्हा ताकदनीशी मेहनत करून नांगरणी करावी लागेले. काही ठिकाणी पावसाळी वाहणारे मोठमोठ्या नाल्यांना तर काही ठिकाणी कालव्याला अशा प्रकारे खांडी गेल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचे खांब देवकान्हे भागात दिसून येत आहे.

देवकान्हेनजीक कालव्याला खांड गेल्याचे सदरील पाटबंधारे खात्याला कळविले असून त्यांनी त्यांची यंत्रणा पडलेल्या खांडीवर युद्धपातळीवर उपाय योजना करत आहेत. तसेच पाटबंधारे खात्याचे विभागीय अधिकारी कदम यांनी पाहणी करून खांड बुजविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

पूरपरिस्थितीमुळे बळीराजा मेटाकुटीला
यावर्षी उशिराने पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी नांगराने तसेच अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने पेरणीची कामे केली. मात्र, गेली काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

पूरपरिस्थितीमुळे या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे पेरणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिल्हे देवकान्हे विभागीय शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

किशोर भोईर,
शेतकरी
Exit mobile version