सरकारकडून आर्थिक मदतीचा प्रयोग
| मुंबई | प्रतिनिधी |
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी संपूनही मुंबई ते कोकण रो-रो बोटसेवा अद्याप सुरू झालेली नाही. प्रवासी तिकीट दर आणि प्रचंड इंधनखर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने ही सेवा व्यावसायिकदृष्ट्या परवडत नाही, असा निष्कर्ष निघाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (व्हीजीएफ) देण्याचा विचार करीत आहे. विशेष बाब म्हणजे, आजवर देशात कोणत्याही प्रवासी बोटसेवेला राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात मात्र काही मंत्र्यांच्या हट्टापायी हा नवा प्रयोग केला जात असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई ते कोकण रो-रो बोटीच्या एका फेरीसाठी 18 ते 20 हजार लिटर डिझेल आणि सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत खर्च होत आहे. त्यामुळे सध्याच्या तिकीट दरांत ही सेवा चालवणे अशक्य आहे. प्रवाशांना परवडणारे दर ठेवले तर ऑपरेटर तोट्यात जातो आणि खर्च भागवायचा प्रयत्न केला तर तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात. त्यामुळे या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सरकार थेट आर्थिक मदत देण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे बोलले जात आहे. या प्रस्तावासंदर्भात महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. रो-रो सेवा सुरू झालीच पाहिजे, या भूमिकेतून व्हीजीएफ किती काळासाठी आणि कोणत्या अटींवर द्यायची, याचा अभ्यास सुरू आहे, असे सागरी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. ही मदत न दिल्यास सेवा सुरू होणार नाही आणि दिल्यास देशात नवा पायंडा पाडणारा निर्णय ठरेल, अशी स्थिती आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर रो-रो बोटसेवेचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर करत मोठ्या आश्वासनांची खैरात करण्यात आली होती.
पुन्हा एकदा निव्वळ आश्वासन?
ज्या रो-रो सेवेची 2014पासून सतत घोषणा होत आहे, ती आजही सरकारी कागदपत्रे, सल्लागार अहवाल आणि आर्थिक पॅकेजमध्येच अडकलेली आहे. आता व्हीजीएफ देऊन तरी सेवा सुरू होईल की हेही आणखी एक गाजर ठरेल, असा प्रश्न कोकणवासीय विचारत आहेत. सरकारने स्पष्ट निर्णय घेतला नाही, तर पुढील वर्षी ही तारीख पुन्हा एकदा निव्वळ आश्वासन म्हणून इतिहासात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण आहे. कोकणातील लोकांना खरा दिलासा देणारे काम बाजूला ठेवून मंत्रीमहोदय महागड्या रो-रो बोटीच्या मागे लागले आहेत. आर्थिक गणित जुळत नसल्याने सरकारी खजिन्यातून व्हीजीएफ देण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे मंत्र्यांच्या हट्टासाठी जनतेच्या पैशांची कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. गणेशोत्सवात मोठे दावे करणारे तेच मंत्री आता मौनात गेले. आधी महामार्ग पूर्ण करा, मग रो-रोची स्वप्ने दाखवा.
– नाना पटोले, आमदार, काँग्रेस
