मजगांव-वेळास्ते रस्त्या दुरावस्थेत

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील मजगांव-वेळास्ते रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. ग्रामस्थांच्यावतीने वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही याकडे संबंधित बांधकाम व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी संदीप गोणबरे यांनी केली आहे.

मजगांव-वेळास्ते रस्ता 2014 साली मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळ संस्था-रायगड यांच्या वतीने तयार करण्यात आला होता. यानंतर रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील पावसाळ्यात पडलेल्या जोरदार पावसाने रस्ता खराब होऊन खाचखळगे व खड्ड्यामुळे दुरावस्था झाली आहे. पावसामुळे मजगांव-वेळास्ते रस्त्यावर मजगांव मराठी शाळा, वाकीचा पाडा, तलावा लगतच्या रस्यावर खाच खळगे व खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व आजारी रुग्णांना त्रास व हाल सहन करावे लागत आहेत. वेळास्ते दुर्गम ग्रामीण भाग असुन रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटीची सुविधा मिळत नाही.

शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने दुर्गम ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी मजगांव-वेळास्ते रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version