श्रीवर्धन ते माणगाव मार्ग सुसाट

पर्यटनवाढीला चालना मिळणार
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धनहून माणगावकडे जाण्यासाठी दीड ते दोन तास लागायचे. तर कधी वाहतूक कोंडीमुळे रखडला जाणारा प्रवास आता तासाभराचा झाल्याने श्रीवर्धन पर्यटन वाढीला चालना मिळणारा आहे.

दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्ट ला जोडणारा माणगाव – दिघी या मार्गाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. काही नेमक्याच ठिकाणी खड्डे व रुंदीकरणाचे काम थांबले आहे. यामुळे थोडा त्रास होत असला तरी नवीन रस्ता पूर्ण होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. गेली कित्येक वर्षे माणगाव ते दिघी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. त्याचा त्रास वाहतुकीला होत होता. सद्या माणगाव ते दिघी दरम्यानच्या मोर्बे, साई व दिघी अशा ठिकाणी कमी प्रमाणात असणार्‍या रस्त्याचे काम लवकरच सुरू करावे अशी मागणी होत आहे.

पुणे व इतर ठिकाणाहून दिवेआगर, श्रीवर्धन व मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी माणगाव वरून साई मार्ग वापरला जातो. माणगाव – दिघी मार्ग जवळपास पूर्ण स्थितीत असल्याने व म्हसळा शहरातील कोंडी दूर झाल्याने रस्त्यावर वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत नसल्याने श्रीवर्धन ते माणगाव एक तासात पोहचता येते असे चालक सांगतात. संबंधित कार्यालयातून अधिक माहिती घेतली असता माणगाव ते दिघी रस्त्याचे काम पावसामुळे थांबले असल्याचे एमएसआरडीसी चे अधिकारी सांगतात.

यावेळी सलग सुट्टीत दिवेआगर पर्यटनाला भेट दिली. मात्र, मागील प्रवासातील त्रास यावेळी जाणवला नाही. माणगाव – दिघी रस्त्याच्या कामामुळे प्रवास आता सुखकर झाला आहे.

सौरभ गायकवाड, पुणे – काळेवाडी, पर्यटक.

माणगाव – दिघी मार्गाचे उर्वरित काम पावसामुळे बंद होते. लवकरच काम सुरू करण्यात येईल. पुढील ऑक्टोबर महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण सुरळीत होईल.

सचिन निफाडे, उपअभियंता
Exit mobile version