माथेरान डोंगरातील रस्ता रखडला
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन विधानसभा निवडणुकीच्या आधी झाले होते. मात्र, अद्याप 15 कोटी खर्चून बांधण्यात येणार्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. श्रेयवादाच्या लढाईत या रस्त्याचे काम रखडले असल्याचा जाहीर आरोप जनजागृती आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष जैतु पारधी आणि सचिव गणेश पारधी यांनी केला आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम सुरु होत नाही म्हणून जनजागृती आदिवासी विकास संस्था 26 जानेवारी रोजी नेरळ माथेरान घाटरस्त्यावर जुम्मापट्टी येथे रस्ता रोको करणार आहेत.
माथेरान डोंगराच्या 200 वर्षापासून पिढ्यान्पिढ्या वसलेल्या 12 अदिवासी वाड्या आहेत. या अदिवासी वाड्या रस्त्यापासून अजूनही वंचित आहेत. आजही या भागातील अदिवासी लोकांना पक्का रस्ता मिळाला नाही. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील जुम्मापट्टी येथून या वाड्यांकडे जाण्यासाठी रस्ता जातो. जुम्मापट्टी धनगर वाडी, बेकरे वाडी, धनगर पट्टा, आसंल वाडी, नाण्याचा माळ, मणा धनगर वाडा, सागाची वाडी, चिंचवाडी, आषाने वाडी, सावरगाव वाडी, किरवली वाडी, भूतिवली वाडी या वाड्यांना जोडणार्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी उरकण्यात आला होता. 12 आदिवासी वाड्यांमधील अंतर साधारण 15 किलोमीटर एवढे असून त्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 15 कोटींचा निधी मंजूर आहे.
या 12 अदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता व्हावा, यासाठी अनेक वेळा रस्ता रोको तसेच ठिय्या आंदोलन, उपोषणे आणि मोर्चे काढण्यात आले आहेत. त्यानंतर वाड्यांना जोडणार्या रस्त्याच्या कामाची निविदा 24 जुन, 2024 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून काढण्यात आली आहे होते. त्याचवेळी कामाचे कार्यादेश असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन झाले होते. साडेचौदा किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाची जमीन आहे. त्यामुळे जून महिन्यापासून वन जमिनीची परवानगी मिळावी, म्हणून प्रयत्न सुरु करण्यात आले होते. तर, कार्यादेश मिळाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही काम सुरु न झाल्याने स्थानिक आदिवासी लोकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.
आता पाच महिन्यांनी पुन्हा पावसाळा सुरु होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा डोंगर भागातील रस्त्याचे बांधकाम करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी संबंधित रस्त्याच्या कामासाठी जनजागृती आदिवासी सेवा संस्था नेरळ-माथेरान घाटरस्ता जुम्मापट्टी येथे रोखून धरणार आहे. परंतु, आपला रस्ता रखडण्यामागचे कारण आदिवासी लोकांनी शोधून काढले आहे. वन विभागाकडील परवानग्यांबाबत संबंधित ठेकेदार सकारात्मक नसल्याने श्रेयवादाच्या लढाईत आदिवासी लोकांच्या येण्या-जाण्याचा रस्ता रखडला आहे.
आम्हाला देश स्वतंत्र होऊन 77 वर्षानंतर देखील घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळालेला नाही. सरकारकडून अनेक वर्षे आंदोलन केल्यानंतर निधी मिळाला आहे, तर आता ठेकेदार काम सुरु करीत नाही. असेच सुरु राहणार असेल तर मला या रस्त्यासाठी शहिद व्हावे लागेल.
– जैतू पारधी, अध्यक्ष आदिवासी विकास संस्था
