निधी मंजूर, मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कृषी पर्यटनाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या नेरळजवळील मालेगाव येथे असलेल्या सगुणाबाग येथे जाणारा रस्ता कधी होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सगुणाबाग पाहिल्यानंतर कळंब रस्त्यापासून मालेगाव सगुणाबाग असा रस्ता करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती.
सगुणाबाग हे कृषी पर्यटन केंद्र गेली 35 वर्षे पर्यटकांच्या सेवेत आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर असलेल्या मालेगावमधून सगुणाबागकडे जाण्यासाठी रस्ता असून, उल्हास नदीला वळसा घालून पुढे जाते. त्यामुळे ग्रामीण टच असलेल्या सगुणाबागकडे राज्यभरातील आणि देशभरातील पर्यटकांची गर्दी असते. सगुणाबागमध्ये असलेले शेत तलावातील घरे आणि तेथील वनराई तसेच बाबुंचे बागेतील घरे यामुळे प्रामुख्याने शनिवार, रविवार पर्यटकांची मोठी गर्दी सगुणाबागेत असते. त्यामुळे सगुणाबागेला देशाच्या कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक समजले जाते. त्याचवेळी कृषी पर्यटनाचे विद्यापीठ म्हणूनदेखील सगुणा बागेने आपली ओळख निर्माण केली आहे.
नेरळ कळंब रस्त्यापासून मालेगावकडे जाणारा आणि पुढे मालेगावमधून सगुणाबाग जाणार रस्ता खडबडीत आणि खड्डेमय दगडांचा आहे. त्यामुळे सगुणाबागमधील रस्ता शासनाने करावा, अशी सूचना भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष माजी आ. पाशा पटेल यांनी सगुणा बागेत भेट दिल्यानंतर केली होती. तर, वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे यांनीदेखील सगुणा बागेत जाणाऱ्या रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
राज्याचे मंत्री आणि माजी आमदार यांच्या नाराजी नंतर शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात सगुणा बागेकडे जाणाऱ्या रस्त्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 40 लाखांची तरतूद केली असून, या रस्त्याची शिफारस आ. महेंद्र थोरवे यांनी केली आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आता मालेगाव ग्रामस्थ करू लागले आहेत.







