| महाड | प्रतिनिधी |
महाड-रायगड मार्गावरील वळणे नव्याने केल्या जाणाऱ्या रुंदीकरणात निघून जातील, अशी आशा असतानाच महाडपासून असणारा वळणदार रस्ता तसाच कायम ठेवण्यात आला आहे. या वळणदार रस्त्यामुळे अपघातांचा धोका कायम राहीला आहे. महाडजवळ तेटघर, चापगाव, कोंझर, आणि पुढे पाचाड परिसरात हि धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि संबंधित तज्ज्ञ अधिकारी, अभियंता यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ऐतिहासिक किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी सुमारे 24 किमीचा महाड-रायगड मार्ग आहे. अनेक वर्षांपूर्वी या मार्गाची निर्मिती झाली आहे. त्यातील काही पुलांची कामे 1980-81 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आलेल्या असताना झाली आहेत. गेली काही वर्षात रायगडावर पर्यटक, शिवप्रेमींच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातून गडावर शिवराज्याभिषेक, छ. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी व जयंती अशा विविध सोहळ्यांना लाखो शिवप्रेमी भेटी देत आहेत. त्यामुळे रायगड परिसरात पार्किंगचा प्रश्न आणि घाट मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. गडावरील वाढती गर्दी पाहता याठिकाणी शासनाने रायगड प्राधिकरण स्थापन करून विकासकामे सुरु केली. त्यातील एक भाग म्हणून रायगड रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीट काम हातात घेण्यात आले. रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी या रस्त्यातील वळणे काढून टाकली जावीत, अशी मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी वळणे ठेवली आहेत त्याठिकाणी जमीन संपादन करणे शक्य होते. शिवाय कांही ठिकाणी मातीचा डोंगर बाजूला करून रस्ता सरळ कसा नेता येईल हे पाहणे देखील शक्य होते. मात्र तसे न केल्यामुळे सद्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचल्यामुळे वाहनांना जपून प्रवास करावा लागत आहे.






